---Advertisement---

Japa = Mind’s Direction

|
Facebook
---Advertisement---

जप म्हणजे मनाची दिशा: मानसिक स्पष्टता आणि आत्मिक स्थैर्याचा मार्ग

जपाला अनेकदा लोक ‘बुरसटलेली गोष्ट’ समजतात. पण वास्तविक पाहिलं तर जप टाळण्याइतकी माणसात शक्तीच नाही. जप हा केवळ देवाचाच नसतो — जप हा जे काही मनात सातत्याने फिरत राहतं ते. म्हणूनच ज्याचा जप मनात चालू आहे तोच खरा आपला देव, आपले ध्येय, आपला धर्म आणि आपली शक्ती ठरतो.

जेव्हा मनात पैसा अखंड फिरतो— तेव्हा पैसा जप बनतो.

जेव्हा मनात मत्सर असतो— मत्सरच जप बनतो.

जेव्हा मनात मुलांचं चिंतन असतं— मुलंच देव बनतात.

म्हणून मोठा प्रश्न हा आहे— आपण काय जपत आहोत? आणि जे जपत आहोत ते आपल्याला दिशा देतं की आपल्याला बांधून टाकतं?

जप का आवश्यक?

मानवी मन रिकामं राहू शकत नाही. रिकामं मन हे रिकाम्या घरासारखं — कधी कोणते विचार येऊन ताबा घेतील ते सांगता येत नाही. त्यामुळे शास्त्र सांगते— मनाला दिशा दे. जपाला दिशा दे. आणि जपातूनच साधना निर्माण होते. जप हा मनावर बंधन नाही — जप हा मनाला दिशा देण्याचा मार्ग आहे.

ध्येयजप आणि नामजप — साधनेचा सुवर्णमध्य

जपाचे दोन मुख्य प्रकार —

1. ध्येयजप (कर्मयोग)

माणूस आपल्या ध्येयाचा अखंड विचार करतो. ध्येयच मनात पुन्हा पुन्हा येतं. कृती, प्रयत्न, निष्ठा हे सर्व ध्येयाकडे वळतात. हा जप बाह्य जीवनाला सामर्थ्य देतो.

2. नामजप (भक्तियोग)

देवाचं नाव किंवा सर्वोच्च तत्त्व मनात ठेवणं. अहंकार वितळतो. मन शुद्ध होतं. हा जप अंतर्मनाला प्रकाश देतो. ही दोन्ही साधनांनी मिळून कर्म आणि भक्तीचा सुवर्णमध्य साधला जातो — जिथे कृतीही शुद्ध आणि अंतःकरणही निर्मळ होतं.

खरा जप कोणता?

तो जो तुमच्यात उन्नती, प्रकाश, स्थिरता आणि शांतता आणतो. आपण जे जपतो तेच बनतो. आपण जे चिंतन करतो तेच आकर्षित करतो. आपण जे धारण करतो त्याचं प्रतिबिंबच आपलं जीवन बनतं. जप — मनाचा शांत प्रवाह आणि साधनेची दिशा. आपल्या आधुनिक जीवनात “जप” हा शब्द जरा जुनाट, बुरसटलेला, किंवा निव्वळ धार्मिक वाटू शकतो. पण खरी गोष्ट अशी आहे की जप हा धार्मिक नाही—तो मानवी मनाचा स्वाभाविक प्रवाह आहे. कारण आपण माणसं सतत काहीतरी जपतच असतो. मनात एकाच विचाराची रीघ धावते आणि तीच पुढे आपलं जीवन बनते.

म्हणून प्रश्न देवाच्या जपाचा नाही; प्रश्न आहे — आपण कोणता जप करतो?

जप — मानवी मनाचं नैसर्गिक कार्य. आपली सकाळ सुरू होते ती जपातूनच. उठलं की अनेक जण चहाचा जप करतात. कोणी पैशाचा जप, कोणी कामाचा जप, कोणी मुलांचा, कोणी मोबाईलचा जप! आपल्या विचारांत जे सतत फिरत राहते, तेच पुढे जप बनतं.

एका व्यापाऱ्याचा किस्सा सांगितला जातो— तापाने थरथरत असताना त्याला डॉक्टराने ताप मोजला आणि म्हणाले, “105°”. व्यापारी अर्ध्या शुद्धीतदेखील म्हणाला, “110 झाला की विकून टाका!” कारण त्याच्या मनात एकच जप चालू होता— बाजारभाव!

हा किस्सा सांगतो, मन जिथे अडकतं त्या गोष्टीचा आपण जप करतोच करतो. थांबवण्याचा प्रयत्न करू शकतो, पण जप टाळू शकत नाही.

मग प्रश्न असा — आपण जप कोणाचा करतो? जप आपल्याला उन्नतीकडे घेऊन जाईल का? की जप आपल्याला थकवून टाकेल?

जप म्हणजे एखाद्या गोष्टीत सतततेने राहणं. त्यात स्थिर होणं. त्या चिंतनात मनाची ऊर्जा वाहणं. म्हणूनच जप करायचाच आसतो. पण कोणत्या दिशेने करायचा—हे आपणच ठरवतो.

अनुष्ठान का आवश्यक?

जगाची निर्मिती कशी झाली, जीवनाचं तत्त्व काय आहे, हे मोठमोठे प्रश्न तत्त्वज्ञान सांगून जातं. परंतु ज्ञान मिळालं म्हणून जाणीव जागृत होत नाही. तेव्हा लागते साधना. लागतो अनुष्ठानाचा शिस्तबद्ध प्रवास. मनाला एक दिशा देणं म्हणजे अनुष्ठान. जिथे मन बाहेरच्या विस्कळीत गर्दीत राहत नाही, तर शांततेत, लक्षात, एका ध्येयात स्थिर होतं.

जपाचे दोन सुवर्णमार्ग

आपल्या शास्त्रांनी जपाचे दोन प्रमुख प्रकार सांगितले—

१. ध्येयजप — कर्मयोगाचा मार्ग

आपल्या जीवनाला एक स्पष्ट केंद्रबिंदू देणं. प्रयत्न ध्येयाभोवती फिरतात. कृती अर्थपूर्ण होते. मन दिशाहीन राहत नाही. जो ध्येयाचा जप करतो, त्याचं जीवन एकाग्रतेच्या तेजाने उजळतं.

२. नामजप — भक्तीयोगाचा मार्ग

नामजप म्हणजे सर्वोच्च तत्त्व मनात धारण करणं. मनातील अस्थिरता शांत होते. अहंकार हलका होतो. मन शुद्ध होतं. भाव वाढतात. नामजप जीवनाला अंतर्मनाचा गहिरा स्पर्श देतो. ध्यान, जप आणि साधना — एकत्रित सत्य. धरतीवरचं प्रत्येक विचारशक्तीचं कार्य जपातूनच सुरू होतं.

जप म्हणजे मनाची दिशा. ध्यान म्हणजे त्या दिशेतील खोली. आणि साधना म्हणजे त्या खोलीत चालणारी प्रामाणिक यात्रा.

म्हणूनच ध्येयजप आणि नामजप — हे दोन्ही मिळूनच संपूर्ण साधना पूर्णत्वास जाते.

खरी साधना म्हणजे मनाचा उन्नत जप. माणूस जप थांबवू शकत नाही, पण जप उन्नत करू शकतो. प्रश्न देवावर विश्वासाचा नाही, प्रश्न आहे विचारांवर नियंत्रणाचा.

कारण—

आपण जे जपतो तेच आपण होतो. ज्याचं चिंतन करतो त्याचं रूप घेऊ लागतो. ज्याला धारण करतो तेच आपल्या जीवनात प्रकटतं.

Rupali

नमस्कार, मी रूपाली महादू लामखडे – व्यवसायानं Software Developer पण मनानं सदैव अध्यात्माशी जोडलेली. 2018 पासून अध्यात्मिक प्रवास सुरू झाला आणि श्रीमद्भगवद्गीता माझ्या जीवनाचा दीपस्तंभ ठरली. या ब्लॉगद्वारे माझं आणि माझ्या वडिलांचं एकच ध्येय आहे – गीतेचा दिव्य संदेश प्रत्येकापर्यंत पोहोचवणे आणि तो प्रत्यक्ष जीवनात उतरवण्यासाठी प्रेरणा देणे.

Leave a Comment