About Us

माझ्याबद्दल

नमस्कार 🙏
मी रूपाली महादू लामखडे, व्यवसायानं Software Developer आणि शिक्षणानं M.Sc. (Computer Science) पदवीधर. पण माझ्या आयुष्याचा खरा श्वास म्हणजे अध्यात्म.

खरं सांगायचं झालं तर माझी आणि माझ्या वडिलांची अध्यात्मातली आवड ही अगदी लहानपणापासूनच होती. 2018 मध्ये जेव्हा मी ब्रह्माकुमारी ईश्वरीय विद्यालयामध्ये पहिले पाऊल टाकलं, तेव्हा माझ्या आयुष्याला एक नवं वळण मिळालं. ध्यान, सकारात्मक विचार आणि मनःशांती यांचा अनुभव घेत घेत माझं जीवन बदलत गेलं.

यानंतर 2020 मध्ये मी स्वाध्याय परिवाराशी जोडले गेले. तिथे मला श्रीमद्भगवद्गीतेचा अभ्यास करण्याची संधी मिळाली. गीता म्हणजे फक्त एक ग्रंथ नाही, तर जीवनाचा मार्गदर्शक आहे हे जाणवलं. आणि इतक्यातच एक अद्भुत योगायोग झाला – गीता जयंतीच्या दिवशीच माझ्या आयुष्यात पुत्ररत्नाचा जन्म झाला. तो मुलगाही अगदीच नटखट, खेळकर, जणू माझ्या घरी छोटासा कान्हा आल्यासारखं!

हा प्रसंग माझ्यासाठी एक दिव्य संदेश होता – गीतेशी माझं नातं आता आयुष्यभरासाठी घट्ट झालं होतं. आणि तेव्हाच मी मनोमन ठरवलं – आपल्याला जे ज्ञान मिळालंय, ते आपण सगळ्यांपर्यंत पोहोचवलंच पाहिजे.

याच विचारातून जन्माला आला हा ब्लॉग –

🌸 Spiritual Well Spring 🌸

हा ब्लॉग माझ्या आणि माझ्या वडिलांच्या एकत्रित प्रवासाचा झरा आहे. येथे आम्ही गीतेतील श्लोक, त्यांचा जीवनाशी असलेला संबंध, आणि त्यातून मिळणारी प्रेरणा सर्वांपर्यंत पोहोचवत आहोत.

आमचं मुख्य ध्येय आहे –
“भागवत गीतेचा संदेश सर्वांपर्यंत पोहोचवणे आणि तो प्रत्यक्ष जीवनात अमलात आणण्यासाठी प्रेरणा देणे.”

गीतेचं एक वाक्य माझ्या आयुष्याचा आधार बनलं आहे –
“कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन.”
म्हणजेच – आपलं कर्म करत राहा, फळाची चिंता करू नका.

आणि आता, या आध्यात्मिक प्रवासात मी तुम्हालाही आमंत्रण देते 🌸
चला, आपण सगळे मिळून श्रीमद्भगवद्गीतेचा दिव्य संदेश आपल्या जीवनात उतरवूया आणि आत्मिक शांतीच्या या झऱ्याचा लाभ घेऊया.