कधी कधी माणसाला आलेला वैयक्तिक अनुभव तोच सार्वत्रिक नियम मानला जातो. “माझं पोट दुखलं म्हणून आता घरी श्रीखंड बंद” – ही मानसिकता जगण्यात दिसते. पण शास्त्र असं नसतं. शास्त्र म्हणजे केवळ एखाद्याच्या वेड्या कल्पनेचं विधान नव्हे; ते बुद्धीनिष्ठ, अनुभवसिद्ध आणि जीवनाला दिशा देणारं असतं.
आपलं आयुष्य ‘भव’ म्हणजे होणं याभोवती फिरतं – मला श्रीमंत व्हायचं आहे, सुखी व्हायचं आहे, यशस्वी व्हायचं आहे. पण या होण्यात अंत नसतो. दोन कोटी मिळाले तरी समाधान नाही; पुढे पाच कोटी, मग दहा कोटी अशी अखंड धडपड सुरू राहते. म्हणून या अखंड ‘होण्याच्या’ प्रवाहालाच भवसागर म्हटलं जातं.
या भवसागरातून बाहेर पडायचं असेल तर ‘भव’ला ‘भाव’ करावं लागतं. “मला व्हायचं आहे” या संकुचित भावनेतून बाहेर पडून “तुम्ही व्हा”, “तुम्ही सुखी व्हा” अशी विशालता अंगीकारली की भावजीवन सुरू होतं. हाच खरा वेदांत.
यातूनच पुढचा टप्पा उलगडतो – कर्मयोग. “मला सुखी व्हायचं आहे” या विचाराऐवजी “दुसरा सुखी व्हावा म्हणून मी करतो” असा भाव निर्माण झाला की खरी कृती सुरू होते. तोपर्यंत जे काही घडतं ते नुसती क्रिया असते; पण जेव्हा कृतीत निःस्वार्थ समर्पण येतं, तेव्हाच ती कर्मयोग होते.
अखेरचा सारांश असा –
‘भव’ म्हणजे सतत होण्याची, मिळवण्याची धडपड.
‘भाव’ म्हणजे विशाल मन, दुसऱ्याचा विचार.
आणि ‘कर्मयोग’ म्हणजे निःस्वार्थ कृती.
भवातून भाव, आणि भावातून कर्मयोग – हा जीवनाला खऱ्या अर्थानं मुक्तीकडे नेणारा मार्ग आहे.