ध्येय नसलेलं जीवन: अंधकाराकडे नेणारी चाल
आपण ध्येयहीन जीवन जगतो आहोत. ज्यात काही अर्थ नाही, अशा तऱ्हेचं जीवन आपल्यातील बहुतेक जण जगताना दिसतात. जगायचं ते कशासाठी? लहानपण, तरुणपण, लग्न, संसार, मुलं, नातवंडं, म्हातारपण आणि शेवटी मृत्यू—हेच जर जीवन असेल तर मग त्यात माणसाच्या विशेषत्वाचा प्रकाश कुठे?
लहानपणी शिकवली जाणारी Solomon Grundy ही कविता त्या वेळेस फक्त वार मोजण्यासाठी शिकवली जात असे. पण आज तीच कविता उपनिषदांसारखी खोल जाणवते. सोमवारी जन्मलो, मंगळवारी मुंज झाली, बुधवारी लग्न, गुरुवारी बाप, शुक्रवारी संसार, शनिवारी आजारपण आणि रविवारी मृत्यू—हेच सर्वसामान्य माणसाचं एक असूरी जीवन.
संपूर्ण आयुष्यभर त्याने अशी एक तरी कृती केलेली नसते की जिच्यावर उभा राहून तो परमेश्वरापुढे उन्नत माथ्याने उभा राहू शकेल. ध्येय नसलेलं जीवन म्हणजे आळणी अन्न. मिठा शिवाय भाजी जशी बेचव, तसंच ध्येयाशिवाय माणसाचं आयुष्यही फिक्कट! माणसाकडे उत्कृष्ट बुद्धी असेल—हा त्याचा गुण.
तो परीक्षेत अव्वल येईल—त्यात आश्चर्य नाही. आई-वडील सुंदर गृहिणी देतील—तेही योग. पण या सर्वांनंतरही जीवनात काही ध्येय नसेल तर काही दिवसांनी तत्किम्? —नंतर काय?
काहीजण खूप पैसा कमावतात. पण काही वर्षांनी त्यांना जाणवतं—हे पैसे कशासाठी? सुरुवातीला पैशाचं आकर्षण असतं, पुढे त्याचं व्यसन लागतं, आणि शेवटी तेही बेचव होतं. जीवनात ध्येय नसेल तर प्रत्येक गोष्ट हळूहळू आपलं तेज गमावते. त्याचं उदाहरण म्हणजे लक्ष्मीपूजन. सुरुवातीला नवीन व्यवसाय, नवीन पैसा—उत्साह असतो. परंतु जसजसा पैसा वाढतो, तसतसा पूजेतला रस कमी होतो. कारण “पैसा कशासाठी?” या प्रश्नाचं उत्तरच नसतं.
‘हे आहे कशासाठी?’
या प्रश्नाचं उत्तर जितकं भव्य असेल तितका माणूसही भव्य बनतो.
ध्येय — साधनेचा प्राण
‘भगवंत माझ्यापाशीच आहे’ अशी प्रचिती ते लोक घेऊ शकतात— जे ध्येयाकरिता रक्ताचं पाणी करतात, जे फक्त जगत नाहीत, तर कार्य पूर्ण करतात. जेवढं ध्येय भव्य, तेवढं जीवन तेजस्वी. ज्यांनी एकदा ध्येयापुढे संपूर्ण जग तुच्छ मानलं, त्यांच्याकडेच प्रचिती, भक्ती, भक्तीमधला परमानंद, आणि अखेरचा साक्षात्कारी अनुभव येतो.
त्यामुळे— ध्येय नसलेलं जीवन म्हणजे अंधकार. आणि ध्येय असलेलं जीवन म्हणजे अखंड प्रवास— शरीराचा नाही, तर आत्म्याचा उर्ध्वगतीचा प्रवास.
🌑 A life without purpose slowly walks into darkness.
When goals disappear, direction fades.
Purpose gives light to the mind, meaning to the heart,
and strength to move forward. ✨
Find your purpose.
Let your life walk toward light, not darkness. 🌱








