---Advertisement---

Naam Jap Explained: The Spiritual Way to Inner Purity

|
Facebook
---Advertisement---

नामजपाचा खरा हेतू — अंतःकरणनिर्मळतेकडे जाणारी वाट. केवळ जप नव्हे, परिवर्तन: नामजपाचा खरा हेतू.

नामजप कशासाठी करायचा?

हा प्रश्न अनेकांच्या मनात येतो. काहींना वाटतं—नामस्मरण म्हणजे भक्तीचा भार; काहींना वाटतं—ते फक्त धीर देण्यासाठी किंवा काही ‘फळ’ मिळवण्यासाठी असतं; तर काहींना वाटतं—ते कमकुवत मनाची खूण आहे.

परंतु सत्य अगदी साधं आहे— नामजप म्हणजे अंतःकरणातील विकार कमी करण्याची प्रक्रिया.

भगवंत तुमच्या बाहेर नाहीत; ते तुमच्या अंतर्यामी आहेत. पण तरी त्यांची अनुभूती का येत नाही? कारण मध्यंतरी तो ‘पडदा’ आहे—विकारांचा, आसक्तीचा, राग-द्वेषाचा, मत्सराचा, अभिमानाचा. विकारांचा प्रभाव जितका प्रबळ, तितकं मन सतत बाह्य विषयांमध्ये गुंतून राहतं. आणि मन विषयांकडे धावत असेल तर ते भगवंताच्या शांत, सूक्ष्म, निरव अनुभवाकडे कसं वळणार? म्हणूनच शास्त्रांनी सांगितलं— नामजप हा मनशुद्धीचा मार्ग आहे.

तो मनाला शांत करतो, स्थिर करतो, प्रसन्न करतो. जिथे स्थैर्य आहे, तिथेच अनुभूती आहे. परंतु समस्या अशी की, जप हा विकार कमी करण्यासाठी आहे, पण माणूस तोच जप विकार वाढवण्यासाठी करतो. काहींना काही मिळवायचं असतं— शांती, संपत्ती, नात्यातलं प्रेम, करियरमध्ये प्रगती… मग जप हा एक प्रकारचा ‘व्यवहार’ बनतो. जप करणारा एक मित्र दुसऱ्याला म्हणतो— “मी जप करतो, कारण माझ्या प्रेयसीचं प्रेम माझ्यावर वाढावं.” हेच जग—त्रिगुणांनी भरलेलं. मन जिथे गुंततं, जपही तिकडे वळतो. ‘मी’ आणि भगवंत यांच्या मध्ये फक्त एकच अंतर — विकार. ‘मी’ म्हणजे चैतन्य, प्रकाश, स्वरूप. भगवंतही चैतन्यमय.

मग फरक कुठे?

मध्यंतरीचे विकार. मन जितकं शुद्ध होत जातं, तितकं ते भगवद्भावाने भरत जातं. विकार कमी झाले की चिंतन स्वाभाविकपणे भगवद्गतीकडे वळतं. शास्त्रात सुंदर सांगितलं आहे— “भगवंत सगुण-साकार झाले, तर तेही आपल्या दृष्टिकोनातील एक ‘विकार’च.” कारण निराकाराला मूर्ती देणं, हे आपल्या मनाचं कार्य आहे. भगवंताला कधीच डोळे नव्हते; पण भक्त म्हणाला—“मला तुझं दर्शन हवं आहे”, म्हणून ते डोळ्यांसकट प्रकट झाले.

नामजपाचा सार — बाहेरच्या भगवंतासाठी नव्हे, तर आतल्या दिसण्यासाठी, नामजपामुळे भगवंत प्रसन्न होतात म्हणून नाही; नामजपामुळे मन प्रसन्न होतं, म्हणून.

मन निर्मळ झालं की— भगवंताचा अनुभव तर अनिवार होतो. जणू धुकं हटलं की पर्वत दिसतो, तशीच विकारांची ढगं सरली की अंतरात्मा प्रकटतो.

Rupali

नमस्कार, मी रूपाली महादू लामखडे – व्यवसायानं Software Developer पण मनानं सदैव अध्यात्माशी जोडलेली. 2018 पासून अध्यात्मिक प्रवास सुरू झाला आणि श्रीमद्भगवद्गीता माझ्या जीवनाचा दीपस्तंभ ठरली. या ब्लॉगद्वारे माझं आणि माझ्या वडिलांचं एकच ध्येय आहे – गीतेचा दिव्य संदेश प्रत्येकापर्यंत पोहोचवणे आणि तो प्रत्यक्ष जीवनात उतरवण्यासाठी प्रेरणा देणे.

Keep Reading

Leave a Comment