क्रांती का अपूर्ण राहते? तत्त्वनिष्ठा आणि मानवी स्वार्थाचा इतिहासातील संघर्ष
क्रांती : तत्त्वांची भाषा आणि स्वार्थाची ऊर्जा. क्रांती तत्त्वांमधून जन्मते, पण स्वार्थावर चालते—लेनिन आणि गांधींच्या इतिहासातून क्रांती का अपूर्ण राहते याचे गूढ सत्य उलगडणारा विचार.
क्रांती ही मुळात तत्त्वांमधून जन्माला येते, पण ती चालते स्वार्थाच्या ऊर्जेवर. हा विरोधाभास समजल्याशिवाय लेनिन, गांधी किंवा कोणतीही ऐतिहासिक क्रांती समजत नाही.
लेनिनने साम्यवादाची उभारणी करताना समतेचे, शोषणमुक्तीचे आणि वर्गविहीन समाजाचे स्वप्न मांडले. परंतु त्या स्वप्नासाठी उभा राहिलेला समूह पूर्णतः तत्त्वनिष्ठ होता, असे नव्हते—हे लेनिन स्वतः मान्य करतो. बहुसंख्य लोक साम्यवादामुळे नव्हे, तर विद्यमान सत्ताधाऱ्यांना खाली खेचण्याच्या संधीमुळे क्रांतीत सहभागी झाले. अन्याय नको होता; पण न्यायाची व्याख्या स्वतःच्या फायद्यापुरती मर्यादित होती.
इथे एक मूलभूत तत्त्व उघड होते—माणूस शोषणाविरुद्ध उभा राहतो, पण स्वार्थाविरुद्ध नाही. त्यामुळे जुनी सरंजामशाही उद्ध्वस्त झाली, पण तिच्याच राखेतून नव्या स्वरूपाची सरंजामशाही उभी राहिली. सत्ता बदलली; वृत्ती बदलली नाही.
गांधीजींच्या बाबतीतही हेच घडले. लोक गांधींच्या मागे गेले, कारण ब्रिटिश सत्ता असह्य झाली होती. परंतु गांधीजींचा ग्रामस्वराज्य, साधेपणा आणि औद्योगिक संस्कृतीविरोध हा तत्त्वात्मक आग्रह सर्वांना मान्य नव्हता. स्वातंत्र्य हे ध्येय सर्वांना मान्य होते; पण त्या स्वातंत्र्याचा नैतिक आशय सर्वांनी स्वीकारला, असे नाही.
म्हणूनच लेनिनची क्रांती यशस्वी झाली, पण साम्यवादाचा आदर्श साकार झाला नाही. गांधीजींची क्रांती यशस्वी झाली, पण रामराज्य प्रत्यक्षात उतरले नाही. कारण क्रांतीनंतर राज्य उभे राहते, पण आत्मशुद्धी उभी राहत नाही.
इतिहासात वॉशिंग्टन, क्रॉमवेल, रूसो यांसारखे महापुरुष अपयशी ठरत नाहीत; अपयशी ठरते ती अपेक्षा—की तत्त्वनिष्ठ माणूस बहुसंख्य असतो. प्रत्यक्षात तत्त्वे दिशा देतात, आणि स्वार्थ लोकसंख्या वाढवतो.
यातून एक गूढ पण कटू सत्य समोर येते :
माणसाने निर्माण केलेल्या मालकी, सत्ता आणि व्यवस्था या संस्था तत्त्वांपेक्षा अधिक स्वार्थावर उभ्या असतात. म्हणूनच त्या संस्था गरज पडल्यास तुटतात, मोडतात, उद्ध्वस्त होतात—आणि पुन्हा नव्या नावाने उभ्या राहतात.
अशा वेळी प्रश्न क्रांतीचा नसतो, तर होता कोण आहे याचा असतो. बाहेरची व्यवस्था बदलणारा होता सहज मिळतो; पण आतल्या स्वार्थाचे हवन करणारा होता दुर्मिळ असतो. आणि जोपर्यंत हा आतला होता जागा होत नाही, तोपर्यंत कोणतीही क्रांती पूर्ण होत नाही—ती फक्त सत्तांतर ठरते.
क्रांती म्हणजे केवळ सत्तेचा बदल नाही; ती मनुष्याच्या अंतःकरणातील परिवर्तनाची मागणी असते. इतिहासात अनेक क्रांती यशस्वी झाल्या, साम्राज्ये कोसळली, नवीन व्यवस्था उभ्या राहिल्या; पण मानवी स्वार्थ जिथे तसाच राहिला, तिथे त्या क्रांती अपूर्ण ठरल्या. तत्त्वे समाजाला दिशा देतात, पण ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी अंतःकरणातील प्रामाणिकता आवश्यक असते. म्हणून खरी क्रांती बाहेरच्या व्यवस्थेत नव्हे, तर मनाच्या गाभाऱ्यात घडली पाहिजे. जेव्हा माणूस स्वतःच्या स्वार्थावर विजय मिळवतो, तेव्हाच समाजातील परिवर्तन टिकाऊ बनते—अन्यथा प्रत्येक क्रांती शेवटी फक्त सत्तांतर ठरते.








